हत्ती पकड मोहिमेसाठीच आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

Edited by: लवू परब
Published on: January 06, 2026 20:38 PM
views 59  views

दोडामार्ग : दोडामार्ग मध्ये उच्छाद  माजविणारे हत्ती पकड मोहिम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वनविभागने दिले. मात्र याबाबत लेखी आश्वासन जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारीही सुरूच होते. 

दोडामार्ग तालुक्यात मागील दोन दशकांपासून हत्तींचा उपद्रव सुरू आहे. सध्या तालुक्यात सहा हत्तींचा कळप उच्चार मांडत असून येथील शेतकऱ्यांच्या शेती, फळ बागायतींचे अतोनात नुकसान करत आहेत. एप्रिल महिन्यात एका शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे वनविभागाने हत्ती पकड मोहीम राबवावी अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केली. शिवाय हत्ती बाधित गावांना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, सरपंच व शेतकरी यांच्यासोबत बैठक लावावी अशी मागणी श्री गवस यांनी केली होती‌. मात्र या मागणीकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी येथील वनविभागाच्या कार्यालयात सोमवारी सकाळपासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनात दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, भाजपाचे नेते एकनाथ नाडकर्णी, कळणे सरपंच अजित देसाई, मोर्ले सरपंच संजना धुमासकर, हेवाळे माजी सरपंच राजाराम देसाई, तुकाराम बर्डे, माजी उपसरपंच समीर देसाई, आनंद शेटकर, दत्ताराम देसाई यांनी सहभाग घेतला. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.

उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी मंगळवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी आपली मागणी लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. मात्र वनविभाग वारंवार पोकळ आश्वासने देत असून आमचा यावर अजिबात विश्वास नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देऊ त्यावर कार्यवाही सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा एकमुखी निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे हे आंदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.