सावंतवाडी : मासिक सभेत उपसरपंच लॅपटॉप घेऊन हेडफोन लावून बसतात. त्यामुळे सभेत त्यांचा लक्ष नसतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे वाचन त्यांना कळत नाही. त्यामुळे सातुळी बावळाट ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असून उपसरपंचांकडूनच झालेले आरोप हे चुकीचे अन् द्वेषापोटी आहेत असा पलटवार सरपंच सोनाली परब यांनी केला.
त्या म्हणाल्या, या आरोपात काही तथ्य नाही. सर्व सदस्यांना विचारात घेवून मी काम करत आहे. बावळाट मुलाडावाडी स्ट्रीट लाईट बसवणे हे काम मंजूर असून ठेकेदाराने 80% काम पूर्ण केलेले आहे. मात्र, त्याला 20% बील अदा करण्यात आलेले नाही. याबाबत 24 जुनच्या मासिक सभेत ठेकेदाराला बोलवून चर्चा झाली. या कामासाठी ठेकेदारा सोबत स्वतः उपसरपंच पोल बसवण्यासाठी हजर होते, हे ठेकेदाराने स्पष्ट केले. मग, यांना या कामाबाबत माहित नाही असे होऊ शकत नाही. ठेकेदार पोल दाखवायला तयार असताना उपसरपंच तयार झाले नाहीत. चिलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर जि.प. अभियंतांनी मोजमाप पुस्तिका तयार करून बील अदा केले आहे ती पुस्तिका ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे.










