
प्रशासन सुरक्षिततेचे सौजन्य कधी दाखविणार ?
दोडामार्ग : तिलारी नदीपात्र सध्या पर्यटकांच्या आनंदासाठी नाही, तर मृत्यूचा सापळा म्हणून चर्चेत येत आहे. दोन वर्षांपूर्वी मामा-भाचीचा झालेला दुर्दैवी अंत अद्याप ताजा असतानाच, काल एका मुंबईच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले. प्रशासनाच्या कमालीच्या अनास्थेमुळे पुन्हा एकदा तशाच घटनांची पुनरावृत्ती होत आहे. "प्रशासनाचे हात रक्ताने माखले आहेत का?" असा संतप्त सवाल आता दोडामार्ग तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे.
नदी की मृत्यूचा सापळा ?
तिलारी नदीचा परिसर निसर्गरम्य असला तरी, कुडासे आणि वानोशी येथील डोह पर्यटकांसाठी 'काळ' ठरत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाला या धोकादायक ठिकाणांची खडान्खडा माहिती असूनही, तिथे साधे धोक्याचे फलक लावण्याचे सौजन्यही दाखवण्यात आलेले नाही.
पावसाळा तोंडावर; धोका वाढणार
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्यानंतर हे डोह अधिकच रौद्र रूप धारण करतात. अशा स्थितीत जर प्रशासनाने आताच प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत, तर भविष्यातील दुर्दैवी घटनांना सर्वस्वी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभाग जबाबदार असेल, असा इशारा दोडामार्गवासीयांनी दिला आहे.
प्रशासन अजूनही ढिम्म का ?
सुट्ट्यांच्या दिवशी विशेष करून एप्रिल मे महिन्याच्या किंवा गर्दीच्या काळात या परिसरात पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात नसते. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन असल्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर केवळ काही दिवस औपचारिकता म्हणून तपास केला जातो, मात्र कायमस्वरूपी सुरक्षेसाठी कोणतीही ठोस नियमावली तयार करण्यात आलेली नाही. दोन वर्षांपूर्वीच्या त्या काळ्या आठवणी ताज्या असतानाच, प्रशासन अजूनही ढिम्म का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जीवघेण्या डोहांच्या ठिकाणी तात्काळ धोक्याचे फलक लावावेत, संरक्षक कठडे किंवा उपाययोजना कराव्यात आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी दोडामार्गवासीयांकडून अत्यंत तीव्रतेने केली जात आहे.
धोक्याची ठिकाणे
१) कुडासे वानोशी डोह: जिथे २ वर्षांपूर्वी मामा-भाचीचा दुर्दैवी अंत झाला.
२) मणेरी नदीपात्र: पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे वारंवार दुर्घटना.
३) तिलारी खोरे: खोल पाण्याचा अंदाज न येणारी अनपेक्षित ठिकाणे.
प्रशासनाचा 'नाकर्तेपणा'
१) धोकादायक क्षेत्रांत एकही 'चेतावणी फलक' नाही.
२) एप्रिल-मे सारख्या गर्दीच्या काळात पोलीस किंवा सुरक्षा रक्षक तैनात नाहीत.
३) ग्रामस्थांनी लेखी तक्रार देऊनही पोलीस प्रशासन गप्प.
४) दुर्घटना घडल्यावर केवळ नावापुरता तपास, कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत.











