
देवगड : जगात शामेलीयन सरडा हा अतिशय दुर्मिळ मानला जातो. कोकणात दरवर्षी पावसाळ्यात हा सरपटणारा प्राणी प्रामुख्याने रस्त्यावर आढळतो. अतिशय धिम्या गतीने आपली पावले टाकत तो रस्ता क्रॉस करताना दिसतो. देवगड तालुक्यातील शिरगाव - साळशी मार्गांवर रंग बदलणाऱ्या या सरड्याचे नयनरम्य दृश्य दिसले.
या सरड्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो इतर सरड्याशी संवाद साधण्यासाठी, लपण्यासाठी तसेच जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी तसेच शरीराचे तापमान राखण्यासाठी त्याच्या शरीरातल्या 'क्रोमाटोफोर्स' नावाच्या पेशीमध्ये रंगद्रव्य असतात. ती पेशी फुलवून किंवा आकुंचन करून तो विविध छटा दाखवतो. त्याच्या डोळ्यांची हालचाल विशेष असते.
दोन्ही डोळे एकमेकांपासून वेगवेगळ्या दिशेने फिरू शकतात. त्यामुळे त्याला आजूबाजूचा परिसर एकाच वेळी बारकाईने न्याहाळता येतो. आपल्या त्वचेतील पेशीच्या रचनेमुळे सतत आपले रंग बदलत असतो. त्याची जीभ लांब असल्यामुळे to लांबचा कीटक सहज पकडू शकतो. हा बिनविषारी सरडा आहे.
या सरड्याला स्थानिक भाषेत 'घोयरा सरडा' किंवा 'गिरगिट' असेहि म्हणतात. तो एकाच वेळी एका डोळ्याने समोर आणि दुसऱ्या डोळ्याने मागचे पाहू शकतो. त्याची जीभ त्याच्या शरीराच्या लांबीपेक्षाही मोठी असू शकते. त्याच्या जिभेच्या टोकावर एक चिकट पदार्थ असतो. त्याच्या मदतीने तो दूरवरच्या कीटकांना पकडू शकतो. त्याचे पाय झाडाच्या फांद्या घट्ट पकडण्यासाठी विशिष्ट आकाराचे असतात. त्याची शेपूट देखील फांदीला गुंडाळण्यासाठी उपयुक्त ठरते. शांत आणि बिनविषारी असलेल्या या शामिलिओन सरडा माणसाला कोणतीहि इजा करत नाही. अतिशय संथ गतीने विचार करून तो पुढे पावले टाकत असतो.










