
प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिक हवालदिल
सिंधुदुर्ग : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असताना, त्याचे गंभीर पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात गॅस टंचाईने उग्र रूप धारण केले असून, घरगुती ग्राहकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. गॅसअभावी अनेक व्यावसायिकांनी आता पुन्हा चुलीचा आणि इंडक्शनचा आधार घ्यावा लागत आहे.
गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करत आहेत. लोकांना गॅस बुकींग करुन पण मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. एजन्सी मध्ये गेले असता तिथे सांगितले जाते की तुम्हाला तुमच्या गावात ज्यादिवशी दिवस ठरवून दिलेला आहे त्यादिवशी गाडी येईल तेव्हा तिथे गॅस मिळेल. पण प्रत्यक्षदर्शनी पाहता गावात गाडी आल्यानंतर तिथे बुकींग होउन आणि त्यांना डिलेव्हरी कोड शेअर करुन पण गॅस मिळत नाही याचे मुख्य कारण असे सांगितले जाते की गॅस एजन्सीमधून गाडी बाहेर पडताना त्यांना जो शेड्यूल दिला जातो. त्यात अर्धी बुकींग झालेल्यांची आणि डिलेव्हरी कोड प्राप्त झालेल्यांची नावेच नसतात. त्यामुळे तास तास गाडीकडे लोकांना थांबावे लागते आणि एजन्सीच्या कर्मचार्यांकडून सांगितले जाते की आमच्याकडे शेड्यूल अपडेट झाला नाही.
चूक नसतानाही दोष...
यात त्या कर्मचार्यांची पण काही चूक नाही एजन्सीकडून गाडी गोडाउन मधून बाहेर पडताना जर पूर्ण शेड्यूल म्हणजे बुकींग झालेल्यांच्या नावांची लीस्ट तसेच जे बुकींग झालेले आहेत त्यांना डिलीव्हरी कोड दिला आहे अशांची फायनल लीस्ट जर कर्मचार्यांकडे दिली जाईल तर हा लोकांना होणारा त्रास आणि त्या कर्मचार्यांना पण होणारा त्रास वाचेल.
बुकिंग आहे, कोड आहे, पण गॅस कुठे?
सरकार एकीकडे 'मुबलक साठा' असल्याचे दावे करत असताना, जमिनीवरील परिस्थिती मात्र भयावह आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. ग्राहकांनी गॅस बुकिंग केले आहे, त्यांच्या मोबाईलवर डिलीव्हरी कोड सुद्धा प्राप्त झाले आहेत, परंतु प्रत्यक्ष गाडी गावात आल्यावर मात्र "तुमचे नाव लिस्टमध्ये नाही" असे सांगून ग्राहकांना रिकाम्या हाताने परत धाडले जात आहे.
गॅस वितरणातील मुख्य त्रुटी:
-अपूर्ण शेड्युल: गोदामातून गाडी बाहेर पडताना कर्मचाऱ्यांकडे बुकिंग झालेल्या सर्व ग्राहकांची अंतिम यादीच नसते.
-अपडेटचा अभाव: तासनतास रणरणत्या उन्हात उभे राहूनही कर्मचाऱ्यांकडून "शेड्युल अपडेट झाला नाही" असे उत्तर मिळते.
-वेळेचा अपव्यय: केवळ ४ सिलिंडर देण्यासाठी गाडीला एका जागी २-२ तास थांबावे लागते, ज्यामुळे पुढच्या गावातील लोकांचा नंबरच लागत नाही.
-हप्तेवारीची प्रतीक्षा: जर ठराविक दिवशी गॅस मिळाला नाही, तर ग्राहकाला पुन्हा पुढच्या आठवड्याची वाट पहावी लागते. एजन्सीमध्ये गेल्यावर "गाडी येईल तेव्हाच मिळेल" असे सांगून ग्राहकांची बोळवण केली जाते.
"सरकार म्हणतंय साठा भरपूर आहे, मग सामान्यांना गॅस का मिळत नाही? हा कृत्रिम तुटवडा आहे की प्रशासकीय नाकर्तेपणा? रणरणत्या उन्हात तासनतास उभं राहूनही रिकाम्या हाताने घरी जावं लागणं, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहेत.











