
वैभववाडी : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना आज (ता.१७) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील मयुर सुर्वे, ओंकार पंढरी सुर्वे (रा.नेर्ले )व पंकज पवार (रा.ताम्हाणे) या तिघांनी जिल्ह्याबाहेरील एका अल्पवयीन युवतीवर नेर्ले येथे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच अत्याचाराचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत युवतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित युवतीने सोमवारी ती राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण वैभववाडी पोलीसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी तिन्ही संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली.
दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी तिन्ही संशयितांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.










