
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मंगळवारी संध्याकाळी कुडाळ येथील मैदानावर अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, सुमेधा पाताडे, संदीप कुडतरकर, काका कुडाळकर, संजू परब, दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, संजय भोगटे, अभी गावडे, मंगेश चव्हाण, अरविंद करलकर, राकेश कांदे, अशोक सावंत, आरती पाटील, सुप्रिया वालवलकर, देवेंद्र नाईक, दीपक पाटकर, ममता वराडकर, बाबू कुबल, प्रभाकर परब, आनंद मेस्त्री, विकी तोरस्कर, ओंकार तेली, अस्मिता बांदेकर, संजय वेंगुर्लेकर आणि प्रीतेश राऊळ यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदारांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या जयघोषात वाढदिवसाचा केक कापण्यात आला. उपस्थित सर्वच नेत्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध : निलेश राणे
सत्काराला उत्तर देताना आमदार निलेश राणे भावूक झाले. ते म्हणाले, "आमच्या कुटुंबासाठी नारायण राणे साहेबांचा वाढदिवस हा एका सणासारखा असतो. माझा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होईल असे कधी वाटले नव्हते, याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. गेल्या दीड वर्षात मतदारसंघात जास्तीत जास्त कामे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आईने शिकवल्याप्रमाणे 'साफ मनाने काम केले तर निकाल नक्कीच चांगला लागतो' यावर माझा विश्वास आहे."
त्यांनी पुढे नमूद केले की, "मागील दहा वर्षांत या मतदारसंघाला अपेक्षित विकास मिळाला नाही. मतदारसंघाची विकासाची भूक मोठी आहे आणि त्यासाठी मी सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. नितेश राणे पालकमंत्री असल्यामुळे कामांना गती मिळणे सोपे होते. आमचे नाते समजून घेण्यासाठी अनेकांना अनेक जन्म घ्यावे लागतील." यावेळी त्यांनी निवडणूक रिंगणात संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले, तसेच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल दत्ता सामंत यांचे कौतुक केले.










