
वैभववाडी : उंबर्डे गावातील मुख्य रस्ता ते वासुदेव पांचाळ यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज दि.१७ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या बारा वर्षांपासून या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला.
उंबर्डे सुतारवाडी येथील मुख्य रस्ता ते वासुदेव पांचाळ यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे मागणी करीत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळपासूनच ग्रामस्थ उपोषणाला बसले.सदर रस्ता खुला करून देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली.
दरम्यान, सायंकाळी गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. ग्रामस्थांच्या या पवित्र्यानंतर गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिल. त्यामध्ये संबंधित मार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रानुसार, ग्रामपंचायत नमुना क्र. २३ मध्ये नोंद असलेला उंबर्डे-वैभववाडी मुख्य रस्ता ते वासुदेव पांचाळ यांच्या घरापर्यंत जाणारा पाणंद रस्ता ७/१२ उताऱ्यात नोंद असून, तसेच ३ सप्टेंबर २०११ च्या दुरुस्ती क्रमांक ४६२/२०११ मधील नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण करून जर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांना ७ दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले. मात्र, लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.










