कणकवली हुंबरठ येथे दुचाकी जळून खाक

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 05, 2026 20:29 PM
views 315  views

कणकवली : कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला हुंबरठ ब्रिजवर अचानक आग लागली. यात दुचाकी वरील कपडे जळून सुमारे एक लाख नऊ हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे खबर कापड व्यावसायिक विक्रांत सुरेश चव्हाण राहणार कोल्हापूर राजारामपुरी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 1:30  वाजण्याच्या सुमारास घडली.

विक्रांत चव्हाण यांचे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर समोर कपड्याचे दुकान आहे. सोमवारी विक्रांत चव्हाण हे मित्र आकाश लालवानी यांच्यासोबत दुचाकी घेऊन सावंतवाडी येथे विक्रीसाठी जाण्यासाठी निघाले. त्यादरम्यान दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास यांचे दुचाकी हुंबरठ ब्रिजवर आली असता अचानक विक्रांत चव्हाण यांना मागून चटका बसू लागला. त्यामुळे त्यांनी गाडी महामार्गावर बाजूला करून थांबवली असता गाडीमधून धुरी येत असून गाडीने अचानक पेट घेतला. विक्रांत यांनी आपल्याजवळ असलेल्या पाण्याच्या बॉटलने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आलं नाही. 

यात दुचाकी व दुचाकी वरील विक्रीसाठी घेऊन जात असलेले कपडे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पण नेमकी गाडीला कशामुळे लागली हे समजू शकले नाही.