कोलझरमध्ये तक्रारदारांनाच प्रशासनाने बजावल्या नोटीसा

महसूलच्या उरफाटा कारभाराबाबत दबावाला भीक न घालण्याचा ग्रामस्थांचा इशारा
Edited by:
Published on: January 29, 2026 18:16 PM
views 156  views

दोडामार्ग : कोलझर येथे ज्या जमिन मालकांनी आपल्या क्षेत्रात झालेल्या अतिक्रमण व अवैध उत्खननाबाबत महसूल पथकाकडे तक्रार केली. त्यांनाच उलट नोटीसा बजावण्याचा उरफाटा प्रकार दोडामार्ग महसूल विभागाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तक्रारदारांनाच नोटीसा पाठविण्यामागे नेमका कोणाचा दबाव आहे ? असा सवाल आता कोलझर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

दिल्ली लॉबीकडून कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, तरी त्याला भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तालुक्यात पाय पसरलेल्या तथाकथित दिल्ली लॉबीच्या विरोधात कोलझर ग्रामस्थांनी यापूर्वीच एल्गार पुकारला होता. गावातील जमिनी विकल्या जाणार नाहीत, अशी शपथ ग्रामदैवतासमोर ग्रामस्थांनी घेतली होती. या भूमिकेचे राज्यभरातून कौतुकही झाले होते. मात्र अलीकडे गावातील काही जमिनींची विक्री झाली असून, ही जमीन डोंगराळ व दाट जंगल असलेल्या परिसरात आहे.

या सर्व्हे नंबरपर्यंत जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटर लांबीचा रस्ता उत्खनन करून, स्थानिकांना अंधारात ठेवून तयार करण्यात आला. या प्रक्रियेत खनिजयुक्त मातीची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली असून, इको-सेन्सिटिव्ह एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा आरोप आहे.

हा प्रकार लक्षात येताच कोलझरवासीयांनी एकत्र येत याला तीव्र विरोध केला, त्यानंतर हे उत्खनन थांबवण्यात आले. हे उत्खनन ग्रामस्थांच्या खासगी तसेच सामाईक जमिनीत झाले होते.

यानंतर दोडामार्ग महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. पंचनाम्यावेळी ग्रामस्थ व जमिन मालकांनी, नव्याने जमीन खरेदी केलेल्या व्यक्तींनी आमच्या जमिनीत घुसखोरी करून माती उत्खनन व वृक्षतोड केल्याचे लेखी जबाब दिले होते. या जबाबांचे रेकॉर्डींगही करण्यात आले होते.

असे असतानाही तहसीलदार राहुल गुरव यांच्या सहीने, ज्या २६ जणांनी तक्रार केली होती, त्यांनाच उलट नोटीसा बजावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

या नोटीसमध्ये, कोलझर येथील सर्व्हे नं. ४४ मध्ये विना परवाना माती उत्खनन करून वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख आहे. तळकट येथील ग्राम महसूल अधिकारी यांनी अहवाल सादर केल्याचे नमूद करून, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोडामार्ग महसूल विभागाच्या या उलट्या भूमिकेमुळे कोलझर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांनी त्यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्यात.

“दिल्ली लॉबीविरोधात आमचा लढा हा केवळ मालमत्ता वाचवण्यासाठी नाही. आमच्या अनेक पिढ्यांनी जपलेला डोंगर, पर्यावरण व जैवविविधता वाचवण्यासाठी हा संघर्ष आहे. येथील बागायती आणि जलस्त्रोत याच निसर्गावर अवलंबून आहेत. धनशक्तीने कितीही दबाव आणला तरी आम्ही झुकणार नाही. लोकशाही मार्गाने आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढाही लढू.”

— श्यामराव देसाई, अध्यक्ष, देवस्थान कमिटी, कोलझर

“या उत्खननाबाबत आम्हीच तक्रार केली होती. पंचनाम्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी लेखी जबाब दिले असताना तक्रारदारांनाच नोटीस देणे कोणत्या कायद्यात बसते? याला उत्तर दिले जाईलच; पण अशा दबावांना आमचा गाव घाबरणार नाही.”

— शरद देसाई, पदाधिकारी, देवस्थान कमिटी, कोलझर

“हा प्रकार नव्याने जमीन खरेदी केलेल्यांनीच केला आहे. त्यांच्या नावांची व पत्त्यांची माहिती तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहे. असे असताना चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होऊ नये. सासोली जमीन प्रकरणात आधीच महसूल विभाग बदनाम झाला आहे. पर्यावरणासाठीचा आमचा लढा पूर्ण ताकदीने सुरूच राहील.”

— हिरबा ऊर्फ आपा देसाई, ज्येष्ठ ग्रामस्थ, कोलझर

“ज्यांच्या मालकीची जमीन आहे त्यांनाच नोटीस जाणार. त्यांनी याआधी जबाब दिला असला तरी आता नोटीसला उत्तर द्यावेच लागेल. आपल्या जमिनीचे संरक्षण करणे हे जमीन मालकांचे कर्तव्य आहे.”

— राहुल गुरव, तहसीलदार, दोडामार्ग