
कुडाळ : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून, यामुळे सामान्य भारतीय जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा तीव्र आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांनी केला. कुडाळ येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महागाईविरोधी आंदोलनात ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन सरकारच्या विरोधात महागाईच्या मुद्द्यावरून अनेक भाषणे केली होती, त्या भाषणांच्या रील आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यावेळचे त्यांचे दावे आणि आजची परिस्थिती यात मोठी तफावत असून, केवळ पैशांच्या बळावर आपली राजकीय ताकद वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी टीका उपरकर यांनी केली. परिस्थिती अशीच राहिली तर देशाचे भविष्य काय असेल, हे आता लोकांना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
देशात 'कॉकरोच पार्टी' अस्तित्वात आली असून, या पार्टीचे फॉलोअर्स दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. सद्यस्थितीत त्यांचे फॉलोअर्स भाजपपेक्षाही अधिक झाले होते. सोशल मीडियावरील हे चित्र देशातील तरुण वर्ग भाजपवर किती मोठ्या प्रमाणात संतप्त आणि रुष्ट आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित करते, असा दावा उपरकर यांनी केला.
या आंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढती महागाई आणि बेरोजगारीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.











