सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या कठोर भूमिकेमुळे वर्षभर रखडलेला झाराप–कामळेवीर रस्ता अखेर सुरू

ठेकेदार बदलताच गावात आनंदाची लाट
Edited by:
Published on: April 14, 2026 18:35 PM
views 148  views

कुडाळ : गेल्या वर्षभरापासून रखडलेला झाराप–कामळेवीर रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला असून सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि कठोर भूमिकेमुळे या महत्त्वाच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली.

मंजुरी मिळूनही संबंधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यामुळे शासनाकडून मिळालेला निधी परत जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर सरपंच दक्षता मेस्त्री यांनी ठाम भूमिका घेत संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आणि कामाला तात्काळ सुरुवात झाली.

आज या कामाचा शुभारंभ होताच ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा रस्ता गावासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच रस्त्यालगत शाळा, मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालय असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी हा रस्ता अत्यावश्यक ठरतो.

दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे काम अखेर सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाचे कौतुक केले असून, “आता गावाच्या विकासाला खरी गती मिळणार” अशी भावना व्यक्त केली जात आहे.