वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 14, 2026 19:30 PM
views 25  views

वैभववाडी : “शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन असून, बदलत्या एआयच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशादर्शक ठरत आहेत,” असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल जाधव यांनी केले.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, हरीश कांबळे, रुचिता कदम, ऋचा पवार, स्मिता पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी स्मारक ते मच्छी मार्केट अशी भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो आंबेडकर अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रफुल्ल जाधव पुढे म्हणाले की, “आज जग एआयच्या क्रांतीच्या टप्प्यावर आहे. मात्र कोणताही बदल झाला तरी आंबेडकरांचे विचार काल, आज आणि उद्याही मार्गदर्शक राहणार आहेत. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे.”

दरम्यान, जयंती सोहळ्यानिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, जि.प. सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, तालुका सरचिटणीस रितेश सुतार आदी मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस रवींद्र पवार, सूत्रसंचालन सहसचिव शरद कांबळे व आभार प्रदर्शन मारुती कांबळे यांनी मानले.