​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज घडवूया

माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 14, 2026 20:24 PM
views 19  views

​कुडाळ :  "महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज देशातील सर्वसामान्य व्यक्तीला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले आहेत. मात्र, सध्या काही शक्तींकडून ही घटना बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा काळात बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांना अपेक्षित असलेला न्यायप्रिय समाज घडवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे," असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

​वाडीवरवडे-समर्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

​वाडीवरवडे समर्थनगर येथील स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार नसतानाही वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

​उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैभव नाईक म्हणाले की, "बाबासाहेबांनी जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. मागील लोकसभा निवडणुकीत हे संविधान बदलण्याचा डाव काही शक्तींनी आखला होता, परंतु देशातील जागरूक जनतेने तो हाणून पाडला. आजही आपल्याला घटनेनुसार पूर्ण हक्क मिळत नसतील, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे."

​या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प. सदस्य रुपेश पावसकर, गंगाराम सडवेलकर, एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, पं.स. सदस्या ममता राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

​तसेच तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, वाडीवरवडे सरपंच प्रणिता धुरी, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सचिन गावडे, किशोर धुरी यांच्यासह समर्थनगर येथील धर्माजी वरावडेकर, सखाराम वरावडेकर, चंद्रकांत वरावडेकर, रवींद्र वरावडेकर, संतोष वरावडेकर, आदेश वरावडेकर, दिगंबर वरावडेकर आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

​वाडीवरवडे गावातील एका छोट्याशा वाडीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत हा उत्सव यशस्वी केला.