
सावंतवाडी : शहरातील फुटपाथचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे अन् नियमानुसार होत नाही. प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेली काम कणकवली प्रमाणे रद्द करण्यात यावीत तसेच अनधिकृत बांधकामांबाबत माहिती देऊनही प्र. मुख्याधिकारी कारवाई करत नसून संबंधितांकडून त्यांना गिफ्ट मिळालेय का ? असा सवाल कॉग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला.
येथील पादचारी मार्गाचे काम हे नियमानुसार होत नसल्याचा आरोप नगरसेवक श्री. शेख यांनी केला होता. सर्वसाधारण सभेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे व्हिडिओ देखील पाठवले होते. मात्र, आपण केलेल्या प्रश्नांना अद्याप उत्तर मिळालेली नाहीत. पादचारी मार्गाचे काम हे नियमानुसार होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कणकवलीप्रमाणे सावंतवाडी नगरपरिषदेत देखील प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेली काम रद्द करून निविदा पुन्हा काढण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बेनामी ठेकेदारांना काम दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दुसऱ्याच्या नावावर ही काम संबंधित ठेकेदारांना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी पुन्हा नगरपरिषदेत येतील तेव्हा नगरसेवकांनाही आमंत्रित करावे असेही आवाहन केले. तर, शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मुख्याधिकारी यांना संबंधितांकडून कोणत गिफ्ट मिळाल म्हणून कारवाई होत नाही का ? असा सवाल नगरसेवक श्री. शेख यांनी केला आहे.











