भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक मालवणात

कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 27, 2026 18:33 PM
views 30  views

मालवण : भाजप युवामोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेचा कोकण प्रांतातील दौरा यशस्वीरित्या पार पडला आहे. या जागर यात्रेतून युवकांना भावणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करण्याचा प्रयत्न होणार आहे. कोकणचा अतिशय सुंदर कोकण दौऱ्याचा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केल्या. 

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा सोशल मीडिया इंफ्लूएन्सर कृष्णराज धनंजय महाडिक हे युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मालवणला भेट दिली. या भेटीत महाडिक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास भेट देऊन शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी महाडिक यांचे भाजपा मालवण कार्यालय येथे भाजपा युवा मोर्चा मालवण शहराध्यक्ष तथा नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना श्री. महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्ती जागर यात्रेची सुरुवात झाली. या कोकण प्रांतात फिरत असताना सर्व नेते मंडळींची भेट घेतली तसेच प्रामुख्याने सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटलो. या माध्यामातून एक संघटन बांधणी आम्हाला करायची आहे. युवा मोर्चाची टीम संघटना वाढीसाठी ताकदीने काम करत असल्याचे निदर्शनास आले. या यात्रेमध्ये फक्त राजकीय विषयच नाहीत तर युवकांना भावणाऱ्या प्रत्येक विषयामध्ये काम करण्याचे आम्ही ठरविले आहे. याच दृष्टीकोनातून सिंधुदुर्ग किल्ला तसेच राजकोट किल्ला याठिकाणी भेट दिली आहे. तसेच रॉक गार्डन येथे काँटेंट क्रिएटर सोबत चर्चा केली, कारण त्यांचे देखील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केले. ना. नितेश राणे हे युवकांना प्रोत्साहित करत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत सुंदर आहे, असेही श्री. महाडिक म्हणाले. 

कृष्णराज महाडिक यांनी रॉक गार्डन येथे कॉफी विथ इंफ्लूएन्सर्स या कार्यक्रमाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लूएन्सर्स सोबत संवाद साधला. यावेळी युट्युबर्स, रिलस्टार, कंटेन्ट क्रिएटर यांनी महाडिक यांच्यासमोर मनोगते व्यक्त करत समस्याही मांडल्या. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले, राजकारणात मी आता सक्रीय झालो असलो तरी या अगोदर खेळामध्ये तसेच काँटेट क्रिएटर म्हणून काम केले आहे. युवा शक्ती जागर यात्रा दौऱ्यामुळे महाराष्ट्रात फिरत असताना काँटेंट क्रिएटर्स सोबत कनेक्ट व्हायला मिळत आहे. तसेच कॉटंट क्रिएटरसाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने आज आपण एकत्र आलो आहोत. काँटेंट क्रिएशन भविष्यात कितपत वाढू शकतो याचा विचारसुद्धा आजच्या घडीला आपण करू शकत नाही. कॉन्टेन्ट क्रिएटर्स माझ्याकडे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडू शकतात. कॉन्टेन्ट क्रिएटर्स व शासन यांच्यामधील मी एक दुवा बनू शकतो व येणाऱ्या काळात कॉंटेंट क्रिएटरसाठी शासनापर्यंत पोहोचून त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतो. क्रिएटर्सनी आपली भाषा, संस्कृती, सण, उत्सव यांचा अभिमान बाळगत त्यांचे प्रदर्शन आपल्या व्हिडीओतून करत त्यांना पुढे नेण्याचे काम केले पाहिजे. त्यातून निश्चीतपणे आपल्याला खूप सारे यश मिळू शकते. ज्याप्रमाणे पर्यटन वाढत आहे त्याचप्रमाणे आपण सतर्क राहणे फार गरजेचे आहे. छुपी प्रेक्षणीय स्थळे समोर आणताना त्यांच्या संवर्धनासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्नील काळे पाटील, भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेविका दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, मंदार केणी, रविकिरण तोरसकर पं. स. सदस्य दीपक सुर्वे, तसेच भाई कासवकर, सेजल परब, अमृता फाटक, मनोज मेथर, पंकज सादये, लकी कांबळी, रोहन सावंत, सुमित सावंत, पंकज पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते.