दोडामार्गात 'गो सन्मान आव्हान' अभियान

Edited by: लवू परब
Published on: April 27, 2026 17:23 PM
views 28  views

दोडामार्ग :  भारतातील गोभक्त, संत समाज व सजग नागरिकांच्यावतीने सुरू असलेल्या गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण निवेदन दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्या मार्फत आज सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे भारतीय संविधानातील अनुच्छेद ४८ व ५१ अ (ग) च्या भावनेनुसार देशातील गोवंशाला “राष्ट्रमाता/राष्ट्रीय वारसा” असा संवैधानिक दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाने “केंद्रीय गोसेवा मंत्रालय” स्थापन करून गोसंवर्धनासाठी एकसंध व कठोर कायदे करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी दोडामार्ग मुख्य पिंपळेश्वर चौक येथून रॅली काढत दोडामार्ग त हसीलदार कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. गोवंश हा भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी व्यवस्थेचा कणा असून, सध्या तस्करी, अपघात व अवैध कत्तलीमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यात गोवंश तस्करी व कत्तल यांना संज्ञेय व गैर-जामिनपात्र गुन्हा घोषित करणे, गोवंशाला “कायदेशीर व्यक्ती” म्हणून मान्यता देणे, प्रत्येक जिल्ह्यात आदर्श गोशाळा व ‘नंदीशाळा’ स्थापन करणे, राष्ट्रीय महामार्गांवर गोवंशासाठी रुग्णवाहिका व उपचार केंद्रे उभारणे, शालेय शिक्षणात ‘गो-विज्ञान’ विषयाचा समावेश करणे, चारा संरक्षण व गोचर भूमी संवर्धनासाठी स्वतंत्र कायदा करणे.

निवेदनात “आत्मनिर्भर भारत” संकल्पना गोआधारित नैसर्गिक शेतीशिवाय अपूर्ण असल्याचे नमूद करून गोआधारित शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.