
रत्नागिरी : राष्ट्रप्रेम असणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. बाकीचे सर्व राजकीय पक्ष स्वार्थासाठी लढत आहेत. आपल्या या राष्ट्रीयत्वाचा विचार घराघरात पोहचवा. रत्नागिरी जिल्हा हा विपरित परिस्थितीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जिल्हा आहे. इथे काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याने 'माझ्यावर विश्वास ठेवणारे किती लोक आहेत' याचा विचार करून लोकसंग्रह वाढवला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरी, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चव्हाण म्हणाले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांच्या निधनाने संघटनेची मोठी हानी झाली. त्यांच्या पश्चात पक्षसंघटनेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे सांभाळणे हेच आपले कर्तव्य आहे. विपरित परिस्थितीतही निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता निर्माण करणे आणि राष्ट्रीयत्वाचा विचार घराघरांत पोहोचवून भाजपचा विचार परिवार वाढवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने देशाचा व राज्याचा गतीमान विकास केला. मोदी सरकार आल्यापासून भारनियमन रद्द झाले. देशाच्या १४० कोटी जनतेपैकी ११० कोटी जनता केंद्र आणि राज्यातील विविध योजनांचा लाभ घेत आहे. जीएसटीमधील सुधारणांमुळे व्यावसायिक, शेतकरी आणि कामगारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. आज देशात ४००हून अधिक महामार्गांचे काम वेगाने सुरू असून, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
संघटनवाढीसाठी 'संघर्ष आणि संघटन' या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट करत चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर मासिक बैठका आणि संवाद नियमित झाला पाहिजे. 'मन की बात'सारख्या उपक्रमांतून बूथस्तरावर एकत्रीकरण शक्य होते. पंतप्रधान मोदी १८-१८ तास काम करून देशाची सेवा करत आहेत. हाच सेवाभाव जपून रत्नागिरीतील प्रत्येक कार्यकर्त्याने क्रियाशील राहावे आणि बूथ मजबूत करावे.
या वेळी व्यासपीठावर प्रदेश महामंत्री, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री, आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, सिंधू रत्न योजनेचे उपाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव, जिल्हा सरचिटणीस आनंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जि. प. गटनेते प्रमोद अधटराव, देवरुखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष समिर तिवरेकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऐश्वर्या जठार उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष, विविध सेल व प्रकोष्ठ यांचे जिल्हा संयोजक, सर्व मंडल अध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.













