
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागात ठेकेदारांनी खोट्या सह्या मारत गैरव्यवहार केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणात गॉड फादर असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. त्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ किरकोळ पैशांचा गैरव्यवहार नसून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ठेकेदार बनावट सही प्रकरणातील गॉड फादरवर कारवाई करा, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केली. संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल , असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, जिल्हा परिषदमध्ये ठेकेदारांनीच खोट्या सह्या मारुन बिले काढल्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आला. या प्रकारात पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून, हा प्रकार कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणात प्रशासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सभांमध्ये अधिका-यांना भिती दाखवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याची माहिती सर्वांना आहे. फक्त मी खाणार आणि बाकी कोणी नाही, अशी परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये एकाची आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही संबंधितांना कोणाचा पाठिंबा आहे, याची चौकशी झाली पाहिजे. कारण काहीजण त्या ठेकेदारांना आपल्या कारमधून घेवून फिरत असल्याचा आरोप उत्तम लोके यांनी केला.
“पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, कोण ‘गॉड फादर’ आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच जिल्हा परिषदेमधील कामांपासून त्यांना दूर ठेवावे. गुन्हे दाखल झालेल्या पाच ठेकेदारांच्या कामांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या भागात कामे केली आहेत, याची तपासणी करावी. खोट्या सह्या करून कामे करणाऱ्यांना पुन्हा शासकीय कामांची परवानगी मिळता कामा नये. त्यांना जिल्हा परिषदमध्ये येताना अटकाव केला पाहिजे , नाहीतर अन्यथा कामांमध्ये असाच घोळ करतील , अशी भिती
“दारिस्ते, नाटळ, दिगवळे, नरडवे, सांगवे, भिरवंडे या भागातील झालेल्या कामांचीही चौकशी झाली पाहिजे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आहेत. जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असेल तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी उत्तम लोके यांनी केली आहे.











