कलंबिस्त येथील प्रकाश मेस्त्री यांचा आकस्मिक मृत्यू

Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2026 19:57 PM
views 14  views

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त-घनशेळवाडी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटेच राहणारे प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) बेडवर मृतावस्थेत आढळून आले. ही घटना १२ मे रोजी सकाळी ६ ते रात्री ९ च्या सुमारास घडली असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मेस्त्री हे कलंबिस्त येथील आपल्या निवासस्थानी एकटेच वास्तव्यास होते. त्यांची मुले कामानिमित्त गोवा आणि मुंबई या ठिकाणी स्थायिक आहेत. मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. शेजाऱ्यांनी त्यांना अनेकदा हाक मारली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संशय बळावल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस पाटलांना तात्काळ पाचारण केले. पोलीस पाटील आणि शेजारील ग्रामस्थांनी मिळून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता श्री. मेस्त्री हे बेडवर मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शत्रुघ्न बाबाजी मेस्त्री यांनी दिलेल्या खबरीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.