LIVE UPDATES

कृषी यांत्रिकीकरण योजनेत एससी, एसटी शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 16:32 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेती अधिक आधुनिक व यांत्रिक करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना कृषी यंत्रे व अवजारांच्या खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट DBT पद्धतीने जमा करण्यात येते. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी MahaDBT Farmer Portal वर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत शेतीसाठी उपयुक्त विविध कृषी यंत्रे व अवजारांच्या खरेदीसाठी नियमानुसार अनुदान देय आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार ४० किंवा ५० टक्के अनुदान देय असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्रे व अवजारांच्या किमतीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद आहे.

ऑनलाईन अर्जासाठी लाभार्थ्याकडे Farmer ID असणे अनिवार्य आहे. तसेच SC किंवा ST प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी संबंधित जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज करताना बँक पासबुकच्या पहिल्या पानावरील माहिती, IFSC कोडसह, उपलब्ध ठेवावी. निवड झाल्यानंतर संबंधित यंत्राचे अधिकृत कोटेशन आवश्यक राहील.

शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत MahaDBT Farmer Portal वर नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करून आपले प्रोफाईल १०० टक्के पूर्ण करावे. त्यानंतर डॅशबोर्डवरील ‘कृषी यांत्रिकीकरण’ या पर्यायातून आवश्यक यंत्राची निवड करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

योजनेतील लाभार्थी निवड ऑनलाईन लॉटरी (लकी ड्रॉ) पद्धतीने करण्यात येते. कृषी विभागाच्या MahaDBT संकेतस्थळावरील शेतकरी प्रोफाईलमध्ये पूर्वसंमती पत्र (Pre-Sanction Letter) प्राप्त झाल्यानंतरच यंत्राची खरेदी करावी. पूर्वसंमती मिळण्यापूर्वी यंत्राची खरेदी करू नये, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.