LIVE UPDATES

विद्यार्थ्यांनी त्रिसूत्रीचा अवलंब करून आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करावे

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांचे प्रतिपादन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 01, 2026 20:34 PM
views 36  views

कुडाळ : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारून वाटचाल केली पाहिजे. जिद्द, चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करावे असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी कुडाळ येथे केले.

दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आस्था फाऊंडेशन, कुडाळ, (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा बॅ. नाथ पै कॉलेज एम. आय. डी. सी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या सोहळ्याचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॅ. नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, दत्ताविष्कार फाऊंडेशन सिंधुदुर्ग अध्यक्ष अमोल चव्हाण, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग उदय शिरोडकर, डॉट कॉम असोसिएशन अध्यक्ष संजय बगळे, संचालक त्रिमूर्ती संगीत विद्यालय डॉ. राहुल गव्हाणकर, राजाराम गव्हाणकर, स्वप्नाली सावंत, विद्या शिरोडकर, सायली शिरोडकर, आयुषी चव्हाण, दिलीप मसके, यलाप्पा दळवी, मारुती गुंजाळ, सहदेव घाडी, मिनीनाथ आडसरे, राजेश परब, सहदेव पालकर, योगेश जाधव, श्री आजगांवकर, विद्यार्थी व पालक शिक्षक आदी उपस्थित होते 

यावेळी सौ. बांदेकर म्हणाल्या, स्लोगन स्पर्धेच्या माध्यमातून कमी शब्दांमध्ये समाजजागृती करण्याचे काम केले जाते. ए. आय. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीत पालकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थी कोणत्या दिशेला जातो आणि कुठच्या क्षेत्राची निवड करतो त्यानुसार पालकांनी त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

अमोल चव्हाण यांनी मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. तिन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या भागातील महिलांनी छोट्या छोट्या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही विविध व्यावसायिक उपक्रम राबवू असे सांगितले.

उमेश गाळवणकर यांनी आज शालेय मुलामध्ये आत्महत्या वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हे आत्महत्या प्रमाण का वाढले याबाबतचे पालकांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. आज मुले ही छोट्या छोट्या कारणासाठी टोकाचा निर्णय घेतात पालकांनी सुद्धा मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यावर कोणतेही शैक्षणिक बंधन लादू नका. मोकळ्या वातावरणात त्याला शैक्षणिक क्षेत्राशी सामोरे जाण्यास शिकवा असे सांगितले. प्रास्ताविकात उदय शिरोडकर यांनी आमच्या तिन्ही संस्था या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, कला या क्षेत्राशी निगडित आहेत. या सर्व क्षेत्रात जास्तीत जास्त सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थेचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती गुंजाळ यांनी केले तर आभार यलाप्पा दळवी यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून केली