LIVE UPDATES

एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थी - ग्रामस्थ त्रस्त

नागरिकांचे सभापती गणेश राणे यांना पत्र
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:38 PM
views 14  views

देवगड : गढिताम्हाणे व रहाटेश्वर परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांना एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, देवगड-तळेबाजार-तेलीवाडी व्हाया सडेवाडी या मार्गावरील एसटी बसफेऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित सुरू आहेत. तसेच सडेवाडीसाठीची महत्त्वाची बसफेरी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. देवगड आगारातून सकाळी सुटणारी बस पूर्वी गढिताम्हाणे मार्गे बागतळवडे होत देवगडकडे जात होती. मात्र ही फेरी बंद करून दुसऱ्या मार्गाने बस चालविण्यात येत असल्याने देवगड महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच तळेबाजार हायस्कूल आणि विविध क्लासेससाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय सकाळी, दुपारी आणि सायंकाळी धावणाऱ्या अनेक बसफेऱ्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी तसेच शासकीय आणि वैद्यकीय सेवांसाठी प्रवास करताना अडचणी निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पूर्वी सडेवाडीपर्यंत जाणाऱ्या काही बसफेऱ्या तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित अडचणी ग्रामस्थांनी दूर करून याबाबतचा आवश्यक पत्रव्यवहारही देवगड आगार प्रमुखांकडे केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

या पार्श्वभूमीवर सडेवाडी बसफेरी तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी तसेच सर्व बसफेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार चालवून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारताना पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी हा प्रश्न संबंधित एसटी प्रशासन व अधिकाऱ्यांकडे तातडीने मांडून बससेवा सुरळीत करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.