
सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून मोठा दिलासा मिळाला असून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ₹३३४.९८ कोटींची मदत मंजूर केली असून त्यापैकी ₹२०९.१० कोटींची विशेष मदत कोकण विभागासाठी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात याबाबत सवाल केला होता. यानंतर ही मदत जाहीर करण्यात आली असून श्री. राणे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
अनेक वर्षांनंतर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांची रक्कम यात जोडलेली नसून ती रक्कम दुसऱ्या टप्प्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, पालकमंत्री नितेश राणे यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.












