LIVE UPDATES

शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची न.प.कडे मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2026 19:18 PM
views 32  views

सावंतवाडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कमालीचा वाढला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मोठी समस्या ठरत आहे. यापूर्वी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, तरीही हा त्रास कमी झालेला नाही. आता न्यायालयाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी व‌ आवश्यकतेनुसार दयामरण देण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक, पादचारी आणि लहान मुलांना त्रास देणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याची योजना तयार केली होती. मात्र, या योजनेची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी, लहान मुले आणि वाहनधारकांना हे कुत्रे अंगावर धावून जात असून चावा घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली होती.

शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रात्रीच्यावेळी भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि भांडणांचा आवाज येतो. यामुळे शहरातील वयोवृद्ध, रुग्णांची झोपमोड होत असून त्यांच्या आरोग्याला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन, न्यायालयाच्या आदेशानुसार पिसाळलेल्या व उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.