LIVE UPDATES

तळवडेत वासरावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

नागरिकांमध्ये तीव्र संताप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 16:39 PM
views 53  views

सावंतवाडी : तळवडे येथील शेतकरी प्रभाकर कांडरकर यांच्या सहा महिन्यांच्या म्हशीच्या वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे तळवडे परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. प्रभाकर कांडरकर यांचे वासरू नेहमीप्रमाणे चरत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यावर हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या तळवडे बाजारपेठ तसेच संपूर्ण गाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.
बाजारपेठेतून ये-जा करणारे पादचारी, लहान मुले, वृद्ध आणि दुचाकी चालक यांना या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्याने पादचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे. यापूर्वीही भटक्या कुत्र्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.आता शेतकऱ्याच्या वासराला गंभीर जखमी केल्यामुळे शेतकरी वर्गात मोठे नुकसान सोसावे लागत आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आता मर्यादेबाहेर गेला आहे. शेतावर जाताना किंवा बाजारपेठेतून चालतानाही भीती वाटते. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तळवडे परिसरात वाढलेल्या या समस्याची गंभीर दखल घेऊन संबधित प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी प्रभाकर कांडरकर यांच्यासह गावातील शेतकरी आणि  सर्वसामान्य ग्राममस्थांतून केली जात आहे.