
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातील लेखा संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने विभागातील विविध लेखाविषयक कामे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याची बाब मंगळवारी झालेल्या वित्त समिती सभेत उघड झाली. यावर समिती सभापती संतोष साटविलकर यांनी नाराजी व्यक्त करत वित्त विभागातून कर्मचारी उपलब्ध करून लेखा कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश दिले.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ, सदस्य सुदन कवठणकर, संजय बोंबडी, सावी लोके, सुप्रिया मेस्त्री, सोनाली घाडीगावकर, क्षमा हडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सभेत विविध विभागांच्या लेखाविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी लघू पाटबंधारे विभागातील अनेक कामे प्रलंबित असल्याचे समोर आले. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, हा विभाग राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला असला तरी अनेक पदे अद्याप रिक्त असून विशेषतः लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावर सभापती संतोष साटविलकर यांनी, विभाग शासनाकडे वर्ग झाला असला तरी त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून खर्च केला जात आहे. त्यामुळे वित्त विभागाने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून लेखाविषयक प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश दिले.











