LIVE UPDATES

राज्यस्तरीय विश्वकोशज्ञानवर्धन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:50 PM
views 23  views

मुंबई : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कुमारांसाठी असलेला कुमार विश्वकोश प्रकल्प याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता नववीच्या सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय ऑनलाइन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये अकोला, अमरावती, अहिल्यानगर, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धाराशिव, धुळे, नंदूरबार, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, बुलढाणा, भंडारा, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांतून सुमारे १८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.


स्पर्धेसाठी मराठी विश्वकोशाच्या कुमार विश्वकोश प्रकल्पातील जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाच्या ठरावीक नोंदी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम म्हणून देण्यात आलेल्या होत्या. एकूण १०० गुणांच्या परीक्षेकरिता ५० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. सुरुवातीला ही स्पर्धा मागील तीन वर्षापासून वाई शहर आणि नंतर वाई तालुका या स्तरावर ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जात होती. त्याला शाळा आणि विद्यार्थ्यांकडून उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळाला. यावर्षी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे आणि सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ मार्च २०२६ रोजी प्रथमच ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन स्वरूपात पार पडली. या स्पर्धेसाठी शहरी व ग्रामीण या दोन विभागातून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय या स्वरूपात विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख रक्कम याप्रमाणे देण्यात येईल : राज्यस्तरीय शहरी/ग्रामीण पहिले १ ते ५ क्रमांक अनुक्रमे रु. १५०००/-, १२५००/-, १००००/-, ७५००/-, ५०००/-. जिल्हास्तरीय शहरी/ग्रामीण पहिले १ ते ३ क्रमांक अनुक्रमे रु. ३०००/-, २०००/-, १०००/- आणि तालुकास्तरीय शहरी/ग्रामीण पहिले १ ते ३ क्रमांक अनुक्रमे रु. १०००/-, ७५०/-, ५००/- तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळणार आहेत.


जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्यांसाठी त्या त्या जिल्ह्यातील मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारितोषिक वितरण होणार असून राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मुंबई येथे मा. मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची यादी मराठी विश्वकोशाच्या https://marathivishwakosh.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेसाठी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाचे सहायक सचिव श्री. ललित कुडमथे यांच्यासह सर्व संपादकीय आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


शालेय विद्यार्थ्यांना कोशवाङ्गय या संकल्पनेची ओळख या स्पर्धेमुळे झाली. किशोरवयीन मुलांकरिता एक विश्वसनीय संदर्भ साधन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कुमार विश्वकोश याची उपयुक्तता शिक्षक व विद्यार्थी या दोहोंपर्यंत पोहोचली. या स्पर्धेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाशी निगडित होता. स्पर्धेची मांडणी विविध शालेय व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी एक पायाभरणी म्हणून आणि विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित होण्यासाठी पूरक ठरली आहे अस मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले. तर  यंदा या ऑनलाइन स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून यासाठी महाराष्ट्रभरातून शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अगदी दुर्गम भागातील विद्यार्थीही घरबसल्या भ्रमणध्वनी, संगणक या माध्यमांतून सहजपणे मराठी विश्वकोशाशी जोडले गेले. स्पर्धेच्या निमित्ताने कुमार विश्वकोश प्रकल्पातील जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडातील अधिकृत आणि विश्वसनीय माहिती नोंदी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाल्याचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी सांगितले.