
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक DD03R9973 हा चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जात होता. भोस्ते घाट परिसरात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावरील डिव्हायडर ओलांडून महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. त्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेच्या मार्गावर येत कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की कंटेनर काही अंतर महामार्गावर घासत गेला. तसेच महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक रेलिंगही या अपघातात नुकसानग्रस्त झाले.
कंटेनर दरीच्या दिशेने घसरत असतानाच तो थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.











