
देवगड : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि सायबर सुरक्षा या विषयी माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी २४ जून २०२६ रोजी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.बी कुनुरे यांनी देवगडच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांचे स्वागत करून केली. या प्रसंगी व्यासपीठावर देवगड पोलिस स्टेशनच्या सविता लाड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रल्हाद कांबळे ,माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रा. अक्षता कांबळे, प्रा. कृत्तिका नाईक, प्रा. सिद्धेश आंगचेकर तसेच ग्लोबल स्टडीज देवगडच्या श्रीमती स्नेहा गावडे आणि संकेत कॉम्प्युटर देवगडचे श्रेय कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी आपल्या मनोगतामध्ये आजच्या आधुनिक काळात अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम आणि सायबर क्राईम मुळे लोकांचे होणारी फसवणूक टाळण्यासाठी सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी आपलं स्वागतपर मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सायबर क्राईम यापासून दूर राहून स्वतःची होणारी फसवणूक टाळावी आणि इतरांनाही जागृत करावे असे मत व्यक्त केले. यानंतर खोड हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.त्यानंतर
देवगड पोलीस स्टेशन च्या उपनिरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्ज मुक्त अभियान आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती तसेच सायबर सुरक्षा अंतर्गत अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यक्ती, कुटुंब,आणि समाज यावर होणारे दुष्परिणाम या बाबत सविस्तर माहिती दिली.त्यानंतर त्यांनी ऑनलाईन फसवणुकीबद्दल देवगडमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या घटनांबद्दल माहिती देऊन समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करण्याविषयीचे आवाहन केले.
त्यानंतर स्नेहा गावडे श्रेय कुबल यांनी सायबर सुरक्षा या विषयावर विविध चित्रफीत आणि पीपीटी याद्वारे बनावट लिंक्स, बनावट संदेश, बनावट प्रोफाईल याद्वारे कशी फसवणूक होते ते सविस्तर सांगितले. त्यासाठी सर्वांनी अद्यावत डिजिटल ज्ञान,जागरुकता आणि सायबर सुरक्षा कौशल्ये आत्मसात करायला हवीत याविषयीची इत्यंभूत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.जान्हवी राणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.











