
देवगड : शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह.केळकर महाविद्यालय,देवगड व श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये बारावी परीक्षेत व पदवीपरीक्षेत विविध शाखांमध्ये आपल्या ज्ञान, संस्कार, जिद्द, चिकाटी व मेहनत याच्या जोरावर अव्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घघाटन शिक्षण विकास मंडळ या संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण विकास मंडळाचे नियामक समिती सभापती एकनाथ तेली, कार्यवाह वैभव बिडये, प्राचार्य डॉ.विजयकुमार कुनूरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पारस जाधव, पर्यवेक्षक प्रा मिलिंद भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना प्रा.प्रल्हाद कांबळे यांनी असा समारंभ घेण्यामागे गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि त्यांचा चिकाटीचे कौतुक व्हावे व त्यांना भविष्यात प्रेरणा मिळावी तसेच इतर विद्यार्थीही यापासून प्रेरणा घेऊन आपले भविष्य उज्वल करतील हा समर्पक हेतू आहे असे प्रतिपादन केले.या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पारस जाधव हे आपल्या स्वागत पर मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना संबोधून म्हणाले कि,असेच यश आपण आपल्या ज्ञान,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवून इतरांपेक्षा स्वतःला वेगळे सिद्ध करा.पर्यवेक्षक प्रा.मिलिंद भिडे यांनी आपल्या मार्गदशनपर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधून सांगितले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण आपल्या शिक्षणाला पूरक असे कौशल्यावर आधारित इतर कोर्सेस सुद्धा केले पाहिजेत जेणेकरून भविष्यात आपल्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच AI( कृत्रिम बुद्धिमत्तेवर) आधारित अभ्यासक्रम व अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे असे प्रतिपादन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी भविष्यात AI वर आधारित नवीन अभ्यासक्रम महाविद्यालयात चालू करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार कुनूरे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे नमूद करत शेतकऱ्यांसाठीही माती परीक्षण व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे सारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमामध्ये बारावी तसेच पदवी स्तरावर महाविद्यालयामधील विविध शाखांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या यशामध्ये शिक्षक आणि महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे असे सांगत महाविद्यालयाविषयी गौरव उद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेश तेली यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी,पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार प्रा.सुहास खरात यांनी मानले.











