LIVE UPDATES

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय हिंदी परीक्षेत नेत्रदीपक यश

दोन विद्यार्थ्यांना 'प्रतिभावंत पुरस्कार'
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 18:43 PM
views 17  views

कुडाळ : येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था 'बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल'च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणवत्तेचा डंका वाजवला आहे. 'महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थान'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हिंदी परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले असून, यामुळे कुडाळच्या शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक वाढला आहे.

या राष्ट्रीय परीक्षेत शाळेतील कु. वेदांत वैभव पालव (इयत्ता तिसरी) आणि कु. वेदांत विठोबा सावंत (इयत्ता नववी) या दोन अष्टपैलू विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 'महात्मा गांधी राजभाषा प्रतिभावंत पुरस्कार' पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केवळ पुरस्कारविजेतेच नव्हे, तर शाळेतील इतर ६८ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल बोलताना, विद्यार्थ्यांची अथक मेहनत आणि त्याला मिळालेली शिक्षकांची योग्य मार्गदर्शनाची जोड यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शाळेच्या हिंदी शिक्षिका प्राजक्ता जाधव आणि शमिका भिसे यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केले होते.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शाळेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हे यश शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही हिंदी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी आणि विषयात प्रगती करण्यासाठी अत्यंत प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली बांदेकर, सर्व शिक्षकवृंद आणि पालक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.