
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग येथे शिवकालीन मर्दानी खेळांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'परंपरा, शौर्य आणि संस्कार' ही त्रिसूत्री आजच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्यावतीने हे शिबिर आयोजित केले असून यामध्ये विद्यार्थ्यांना लाठी-काठी, तलवारबाजी, पारंपरिक युद्धकला आणि आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, असा आयोजकांचा मानस आहे. हे शिबिर २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ७:३० ते १० या वेळेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार आहे.
८ वर्षांवरील मुला-मुलींसाठी हे शिबिर खुले असून दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये आणि इतर शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शिबिरासाठी जागा मर्यादित असून इच्छुकांनी नावनोंदणीसाठी ९४०५९५८२८६ किंवा ९६६५३०५००७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे












