जिल्हा परिषदेत पहिल्याच दिवशी गोंधळ

एकाच सभागृहावर दोन समित्यांची वेळ ; समन्वयाचा अभाव उघड
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 22, 2026 19:21 PM
views 111  views

सिंधुदुर्गनगरी : खातेवाटपानंतर तब्बल चार वर्षांनी सुरू झालेल्या विषय समित्यांच्या सभांना पहिल्याच दिवशी गोंधळाचे ग्रहण लागल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पाहायला मिळाले. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे एकाच वेळेस एकाच सभागृहात दोन समित्यांच्या सभा नियोजित करण्यात आल्याने सदस्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

आज सकाळी ११ वाजता समाज कल्याण समिती आणि कृषी समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही सभा बॅ. नाथ पै समिती सभागृहातच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित सभागृहात दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडे असतानाही त्याच ठिकाणी सभा नियोजित करण्यात आल्याने नियोजनातील त्रुटी उघड झाल्या.

सभागृह वापरण्यायोग्य नसल्याने समाज कल्याण समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हलविण्यात आली. तर कृषी समिती तसेच पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीच्या सभा उपाध्यक्ष दादा साईल यांच्या दालनात घेण्याची वेळ आली. समाज कल्याण समितीची सभा सभापती रुहिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभा उपाध्यक्ष दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या.

सभांना विलंब; सदस्य त्रस्त

सभागृहाच्या अनुपलब्धतेमुळे आणि अचानक बदललेल्या व्यवस्थेमुळे सभांना विलंब झाला. सकाळी ११ वाजता नियोजित समाज कल्याण समितीची सभा तब्बल ११:४५ वाजता सुरू झाली, तर दुपारी १२ वाजताची पशुसंवर्धन समिती सभा थेट १ वाजता सुरू झाली. या गोंधळामुळे सदस्यांना प्रतीक्षा करावी लागली आणि कामकाजावरही परिणाम झाला.

उपाध्यक्षांच्या दालनात सभा

सभागृह उपलब्ध नसल्याने उपाध्यक्ष दादा साईल यांना पहिल्याच दिवशी आपल्या दालनात सभा घेण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समन्वयाच्या अभावावर प्रश्नचिन्ह

एकाच वेळी दोन सभा आणि एकच सभागृह यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून विभाग, प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. विषय समित्यांच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गोंधळामुळे प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर टीका होत असून पुढील काळात अधिक समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.