
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम २८ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात उत्साहात राबविण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कुडाळ शहरातील विविध भागात विशेष स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेस कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.
या मोहिमेदरम्यान मुख्य गणेश घाट ते पंचायत समिती कुडाळ परिसराची सखोल साफसफाई करण्यात आली. तसेच कवीलकट्टे येथील मुख्य ओढ्यावरील पाणवठा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून तेथील कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ पदार्थ गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि लोकसहभागाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली. "स्वच्छ व सुंदर कुडाळ शहर घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे," असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.










