
सावंतवाडी : आपले घर स्वच्छ ठेवण्यासोबतच आपले शहरही स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आज शहरात एका विशेष स्वच्छता मोहिमेचे (क्लीन-अप ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले. शिरोडा नाका ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधी परिसरादरम्यान ही स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली.
या मोहिमेत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले, भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे सावंत-भोसले, आरोग्य सभापती सुधीर आडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष उतरून स्वच्छता केली.
या मोहिमेला आरोग्य कृती समिती सावंतवाडीचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. यामध्ये एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, संजय पिळणकर, कुमारी प्रदीप्ती कोटकर, नारायण आकेरकर, गणराज रेडकर, सुनील मारुती तुळसकर, प्रतिभा रेडकर, ॲड. रितू रवींद्र परब, राहुल परब, शमिका नेमळेकर, रुपाली रेमुळकर, सचिन मोरजकर, नगरपालिकेचे अधिकारी दीपक म्हापसेकर आणि नगरपालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या मार्गावरील कचऱ्याची विल्हेवाट लावत परिसर चकाचक केला.
ही स्वच्छता मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून पुढील दोन दिवसही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. “जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, तसेच आपले शहर स्वच्छ ठेवणे ही देखील आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन करत नगराध्यक्षांनी सावंतवाडीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.










