
सावंतवाडी : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षा निमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ''ज्ञानियांचा राजा'' मोगरा फुलला कार्यक्रम सावंतवाडीत संपन्न झाला. मात्र, या कार्यक्रमाकडे जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवल्याचे चित्र सावंतवाडीत पहायला मिळाले. उद्घाटनप्रसंगी हे प्रकर्षाने जाणवले. संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाची जिल्ह्यात हवी तशी प्रसिद्धी न झाल्याने जिल्ह्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्राची गोडी असणारे श्रोते यापासून वंचित राहिले. एका सुंदर कार्यक्रमाला त्यांना मुकाव लागल. सोशल मिडियावरील या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघितल्यानंतर श्रोत्यांकडून हळहळ केली जात आहे.
प्रसिद्ध व्याख्याते, स्वास्थ व समाज विषयक निरूपणकार गणेश शिंदे व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सावंतवाडी येथे संपन्न झाला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'ज्ञानियांचा राजा' चे महात्म्य आजच्या पिढीला कळण्यासाठी या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीही पाठ फिरवली. उद्घाटन सोहळ्याला शेकडोंची आसन क्षमता असणाऱ्या या कार्यक्रमास जेमतेम ५० श्रोतेही उपस्थित नव्हते.
कार्यक्रमाचा प्रसार करण्यात सांस्कृतिक विभाग कमी पडल्याचे बोलले जात असून सोशल मिडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सावंतवाडी सारख्या कला-सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा लाभलेल्या भूमितील श्रोते एका चांगल्या कार्यक्रमाला मुकल्याची खंत अनेक श्रोत्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक विभागाने असे दर्जेदार कार्यक्रम करताना त्याचा लाभ अधिकाधिक श्रोत्यांनाही व्हावा यासाठीही दक्षता घ्यावी, असेही काहींचे म्हणणे आहे. जवळपास तिन तास हा कार्यक्रम येथील बॅ. नाथ पै सभागृहात चालला. सुगम संगीतासह अभंग गायन, संत वचन अन् प्रबोधनपर निरूपणाने व्याख्याते श्री. शिंदे व सहकाऱ्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. प्रेक्षकांची उपस्थिती अन् मिळणारी दाद कार्यक्रम सादर करण्यासाठी आमचा हुरूप अधिक वाढवते, अशी भावना श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे सांस्कृतिक विभाग व स्थानिक प्रशासनाने असे सांस्कृतिक कार्यक्रम करताना त्याचा लाभ श्रोत्यांनाही व्हावा याचीही दक्षता भविष्यात घ्यावी, असे आवाहन रसिक श्रोत्यांकडून व्यक्त केले जात आहे.











