
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलींनी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या 'डिपेक्स -२०२६' या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये चमकदार कामगिरी करत मानाचा एमएसबीटीई पुरस्कार आणि रोख पंचवीस हजारांचे पारितोषिक पटकावले. त्यांनी सादर केलेल्या 'प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स सिस्टीम' या प्रोजेक्टला हा सन्मान मिळाला. जागतिक महिला दिना दिवशीच विद्यार्थिनींना हा पुरस्कार जाहीर झाल्याने कॉलेज सोबतच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद ठरली.
तृतीय वर्ष डिप्लोमा कॉम्प्युटरच्या भक्ती साटम, भक्ती सावंत, साक्षी सावंत, नंदिनी सिंग आणि पर्णवी शिर्के या विद्यार्थिनींनी हा प्रोजेक्ट तयार केला. औद्योगिक क्षेत्रातील मशिन्सची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी हा प्रोजेक्ट उपयुक्त ठरणार आहे. सेन्सर्सच्या साहाय्याने मशिन्सचा वेग, तापमान, आवाज, व्होल्टेज आणि करंट यांसारख्या घटकांवर लक्ष ठेवून संभाव्य बिघाड होण्यापूर्वीच इशारा देणारी ही यंत्रणा आहे. यामुळे कंपन्यांचा देखभाल खर्च कमी होण्यास तसेच अचानक काम थांबण्याने होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल. विद्यार्थिनींनी पवनचक्की मॉडेलच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सादर केला. त्यांना विषय शिक्षिका एस.एस.कदम यांचे मार्गदर्शन लाभले. डिपेक्स -२०२६ हे राज्याच्या विविध विभागांतील वर्किंग मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन असून त्याची अंतिम फेरी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. राज्यभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुलींसोबत कॉलेजचे अधिव्याख्याता एम.टी.पाटील व एस. एस.कदम उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, टीपीओ हेड मिलिंद देसाई, विभागप्रमुख प्रशांत काटे व प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर तेजस म्हपणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.











