महिलांचा सन्मान ठेवण्यासाठी जि. प. चा महत्त्वाचा निर्णय

एकेरी उल्लेख टाळण्याचे आदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 10, 2026 12:58 PM
views 47  views

सिंधुदुर्गनगरी : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयीन व्यवहारात कोणत्याही महिलेला एकेरी नावाने संबोधू नये, त्यांना सन्मानपूर्वक संबोधावे, अशा स्पष्ट सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

महिला दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, आरोग्याशी संबंधित अडचणी तसेच कार्यालयीन वातावरणाबाबत विविध मुद्दे समोर आले. या पार्श्वभूमीवर महिला कर्मचाऱ्यांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आपत्ती नियंत्रण विभागाच्या ड्युटीसाठी महिलांना नियुक्त न करण्याची दक्षताही घेण्यात येणार आहे.

महिला कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार करून आठवड्यातून एक दिवस सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत योगा सत्र आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविणे, तसेच लिफ्ट दुरुस्ती यांसारख्या कामांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधांमुळे महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.

पदाधिकाऱ्यांच्या सन्मानासाठीही निर्णय

जिल्हा परिषदेत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सन्मान करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनांची स्वच्छता करण्यात आली असून त्यांच्या सूचनांनुसार अंतर्गत सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार असल्याचेही खेबुडकर यांनी स्पष्ट केले.