
सिंधुदुर्ग : सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. वास येणार 'फ्रुट सॅलड' प्रवाशांना दिल्याने प्रवासी आक्रमक झाले. संबंधित विक्रेत्याकडे कंपनीचे, ठेकेदाराचे नाव नंबर नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी रेल्वे टीसीनी देखील याची दखल घेतली. संबंधित कंपनीला १ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, योग्य कारवाई न झाल्याने प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या फ्रुट सलाड मधील कलिंगड हे नासलेल होत. त्याला वास येत होता. यावेळी विक्रेत्यानही ते मान्य करत बदल्यात दुसर पॅकेट देतो असे सांगितले. यावेळी ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी यावर आक्षेप घेतला. अशामुळे प्रवाशांना विषबाधा झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला. तसेच रेल्वेचे टीशर्ट घालून हे प्रवासी कसे काय व्यवसाय करतात ? यांच्याकडे ओळखपत्र नाही. कोणाची कंपनी, ठेकेदार त्यांचे नंबर नाहीत. हा नेमका प्रकार काय असा सवाल त्यांनी रेल्वेती निरीक्षकांना केला. यावर टीसी व निरीक्षकांकडून संबंधिताला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा दंड योग्य नसून अशावेळी मोठा दंड आकारणे गरजेचे आहे. अशा लोकांचे ठेके रद्द करा अशी मागणी उपस्थित प्रवाशांनी केली. तसेच कोकण रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच काही प्रवाशांनी याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे रेल्वेमध्ये बराच काळ तणाव निर्माण झाला होता.










