
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारण आणि विकासाबाबत ज्या वल्गना केल्या जातात, त्यामागील वास्तव आणि वस्तुस्थिती जनतेसमोर यायला हवी. आज कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचा जो आवाज मंत्रालयात आणि विधानसभेत पोहोचत आहे, तो भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात घुमू लागला तर काय होईल हे सांगता येणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया शिंदे शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी व्यक्त केली.
देवगड येथील शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साळसकर म्हणाले, मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मी उमेदवार होतो. त्यावेळी शिवसेना-भाजप युती होती. तालुक्यात आमची अपेक्षित ताकद नसल्यामुळे आम्ही सामंजस्याने युती स्वीकारली. आमची मागणी एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती जागांची होती. मात्र आम्हाला जिल्हा परिषदऐवजी तीन पंचायत समिती जागा मिळाल्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत युती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.
मी स्वतः मणचे पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली. अवघ्या शंभर मतांनी माझा पराभव झाला. तो पराभव मी मनापासून स्वीकारलेला नाही. मात्र त्यावर मी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी माझे प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विष्णू घाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशावेळी घाडी आणि पालकमंत्र्यांची भाषणे ऐकून मला आश्चर्य वाटले. प्रवेश भाजपमध्ये झाला, पण चर्चेचा विषय विलास साळसकर होते. माझ्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यांवर मी भाष्य केले नाही तर मीच दोषी ठरेन.
देवगड तालुक्याला प्रथमच पालकमंत्रीपद मिळाले आहे. राज्यात मोठे बंड करून सत्ता स्थापन झाली. या सत्तेचा फायदा जनतेला व्हावा म्हणून आम्ही शांत राहिलो. मात्र किती काळ गप्प राहायचे? अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे अन्याय सहन करणे आमच्या स्वभावात नाही.
काल झालेल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे शिवसेनेचे मणचे येथील सरपंच यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊ नयेत, अशी भूमिका असताना हे घडले. विशेष म्हणजे हेच सरपंच एक वर्षापूर्वी ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत आले होते आणि त्यांचा प्रवेश आपणच घेतला होता. २३ मे रोजी सरपंच आणि ग्रामस्थांची पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर हे प्रवेश झाले.
आम्ही स्थानिक पातळीवर पक्षसंघटना वाढविण्याचे काम करत आहोत. मात्र आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतली नव्हती. परंतु आमच्या पक्षाचे अस्तित्वच संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्हालाही आमच्या पदाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरावे लागेल आणि भविष्यात तसे करणार आहोत. ही वेळ आमच्यावर आणली गेली आहे.
ठाकरे शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार काल जाहीरपणे म्हणाले की, राणे साहेबांच्या सहकार्यामुळे ते निवडून आले. तसेच साळसकरांचा प्रचार बंद झाल्यानंतर माझा प्रचार सुरू व्हायचा, असेही त्यांनी म्हटले. प्रत्यक्षात माझा प्रचार सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू असायचा. बिनविरोध निवडणुकांचा जो फॉर्म्युला राबवला गेला, त्यामध्ये चार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात माझा सिंहाचा वाटा होता. आज टाळ्या वाजवणारे अनेक जण त्यावेळी रात्री उशिरापर्यंत मला फोन करून सल्ला घेत होते.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. जिथे काम करतो तिथे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करतो. आज म्हणतात विलास साळसकर यांना नियोजनपूर्वक पराभूत केले. एका निवडणुकीने काही फरक पडत नाही. पुढील निवडणुकांमध्ये काय ताकद आहे ते दाखवून देऊ.
पालकमंत्र्यांकडे मी विविध विकासकामांबाबत अनेक निवेदने दिली आहेत. मात्र त्यापैकी एकाही कामाला अद्याप गती मिळालेली नाही. रहाटेश्वर-गढीताम्हाणे रस्त्यावरील बेकायदा माती उत्खननाचा मुद्दा मी उपस्थित केला होता. त्यानंतर देवगड-निपाणी मार्गावरील बेकायदा उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ५ कोटी ९१ लाख १२ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला. त्याबाबतचा आदेश माझ्याकडे आहे. मात्र केवळ आदेश देऊन चालणार नाही, त्या दंडाची प्रत्यक्ष वसुली झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे.
घाडी हे चाळीस वर्षे राजकारणात असल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या राजकारणाची खरी स्थिती त्या भागातील जनतेला चांगली माहिती आहे. माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून मी बाजूला होत बाळासाहेबांच्या विचारांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. माझ्या परीने जनतेसाठी काम करत आहे. त्यामुळे विलास साळसकर राजकारणातून संपला किंवा बाद झाला आहे, असा कोणाचाही गैरसमज होऊ नये.
आजही देवगड तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीतील घडामोडींवर माझे बारकाईने लक्ष आहे. तालुक्यात काय घडते याची संपूर्ण माहिती पालकमंत्र्यांनाही आहे, असे सांगत साळसकर यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केली.










