LIVE UPDATES

कुंपणाचे गेट तत्कालीन सरपंचांनी भंगारवाल्याला विकले

कारवाई झाली नाही | मशाल आंदोलनाचा इशारा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 31, 2026 20:36 PM
views 55  views

मालवण : गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या कुंपणाचे मोठे गेट तत्कालीन सरपंचांनी कोणतीही अधिकृत नोंद न करता भंगारवाल्याला विकले. यासंदर्भात लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारे चौकशी पोलीस खात्याने केली नाही असा आरोप करत प्रशासनाच्या निषेधार्थ 1 जुन रोजी रात्री 8 वाजता कार्यकर्त्यांना घेऊन मालवण बस स्थानक ते पोलीस ठाणे येथे मशाल आंदोलन करणार असा इशारा समाजिक कार्यकर्ते  महेश जुवाटकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

जुवाटकर यांनी म्हटले आहे, गोळवण कुमामे डिकवलंचे तत्कालीन सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीचे गेट भंगार व्यापारी समद किताबुल्ला चौधरी याला विकले. यासंदर्भात तोंडी व लेखी तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशी झालेली केली नाही.

दरम्यान, या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्याने जुवाटकर यांना पत्र दिले आहे, त्यात म्हटले आहे हे प्रकरण अदखलपात्र गुन्ह्याचे असल्याने बीएनएसएस कलम १७४(२) अन्वये तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यासाठी मालवण पोलीस ठाण्याकडून जावक क्रमांक २९१०/२०२६, दिनांक २२ मे २०२६ रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, मालवण यांना पत्र पाठविण्यात आले आहे. न्यायालयाकडून तपासाची परवानगी प्राप्त होताच अदखलपात्र गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.