LIVE UPDATES

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 17:35 PM
views 38  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट, तर दि. ७ व ८ जुलै २०२६ रोजी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.दि. ४ जुलै ते दि. ६ जुलै २०२६ या अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २२२ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून, कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३२० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे, धरणे आणि सखल भागांवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.जिल्ह्यातील दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या गावांतील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना दरड कोसळण्याची संभाव्य लक्षणे ओळखणे, नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही धोक्याची चिन्हे आढळताच तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.नद्यांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत दि. १ जून ते दि. ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामार्फत नदीपात्रातील पाणीपातळीचे सातत्याने निरीक्षण करून त्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला दिली जात आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यास संबंधित गावांतील नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. ८ जुलै २०२६ पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसाच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त अथवा वेगाने वाहणारे ओढे-नाले ओलांडू नयेत, दरडप्रवण भागात विशेष काळजी घ्यावी, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक जिल्ह्यात तैनात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही आपत्तीजन्य घटना घडल्यास या पथकाकडून तात्काळ शोध व बचाव कार्य हाती घेतले जाणार आहे.याशिवाय, जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात मान्सून कालावधीसाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून पोलीस विभाग, महावितरण, एस.टी. महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनीही स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. शोध व बचावासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि आपत्कालीन संसाधने पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली असून सर्व विभागांमध्ये सातत्याने समन्वय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अधिकृत हवामान इशारे आणि प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ संबंधित नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.