
सावंतवाडी : अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा रातोरात उभारल्याची खळबळजनकसह आनंददायी घटना ओटवणे देऊळवाडी येथे घडली. पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच चौकशी झाली. पण पुतळा कोणी उभारला ते स्पष्ट झाले नाही. अखेर आपल्या वाडीत हा पुतळा उभारल्यामुळे देऊळवाडीतील युवकांनी या पुतळ्याची पुढील जबाबदारी घेत असल्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिली.
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्यामुळे ओटवणे गावातील शिवप्रेमींमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या नव्याने उभारलेल्या पुतळ्याचे अनेक शिवभक्तांनी दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून गावात सार्वजनिक ठिकाणी शिवरायांचा पुतळा असावा अशी ओटवणेवासियांची इच्छा होती. अज्ञात शिवप्रेमींनी धाडसाने आणि निष्ठेने हे कार्य करून आमचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली.
पुतळा उभारण्यापूर्वी या जागेवर कोणतीही हालचाल नव्हती. मात्र भल्या सकाळीच स्थानिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा आणि भव्य पूर्णाकृती पुतळा उभारल्याचे दिसून आले. अत्यंत गुप्ततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काही अज्ञात शिवप्रेमींनी एकत्र येऊन रातोरात हा पुतळा स्थापित केला. रातोरात घडलेल्या या 'शिवकार्या'ची चर्चा ओटवणे दशक्रोशी परिसरात सुरू आहे. आता या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी आणि पुढील सुशोभीकरणासाठी देऊळवाडीतील ग्रामस्थ आणि तरुण एकत्र येत असून या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वजण सतर्क आहेत.










