LIVE UPDATES

प्रतिज्ञापत्रात व्यवसायाची माहिती लपवल्याचा सरपंचांवर आरोप

चौकशीची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 26, 2026 21:27 PM
views 18  views

वैभववाडी : नापणे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप जैतापकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यवसायाबाबत अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गावातील विनय कोकरे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

सन २०२२ मध्ये नापणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यावेळी प्रदीप जैतापकर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःचा व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले होते.

तक्रारदार विनय कोकरे यांच्या म्हणण्यानुसार, जैतापकर हे रिक्षा व्यवसायही करीत होते. मात्र त्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत लपवून निवडणूक यंत्रणेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सरपंच प्रदीप जैतापकर यांनी आपल्याविरोधातील तक्रारीबाबत तहसीलदारांकडे स्पष्टीकरण सादर केल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीची निवडणूक २०२२ मध्ये झाली असून आपण रिक्षा व्यवसाय २०२३ पासून सुरू केला असल्याने प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.