LIVE UPDATES

धडकेनंतर विद्युत पोल कोसळला

दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2026 21:48 PM
views 31  views

सावंतवाडी : मळेवाड येथे मध्यरात्री एका अज्ञात अवजड वाहनाने धुमाकूळ घालत विद्युत पोल आणि काजूच्या झाडाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विद्युत पोल जमीनदोस्त झाला असून, एक दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला. अपघात घडवून संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


आज पहाटे अडीचच्या सुमारास मळेवाडहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अवजड वाहनाने रस्त्याशेजारील काजूच्या झाडाला व विद्युत वाहिनीच्या खांबाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, खांब अक्षरशः जमीनदोस्त झाला. आवाजामुळे जाग आलेल्या सामाजिक कार्यकर्ते दीपक करमळकर यांनी तातडीने वीज विभागाशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघाताच्या वेळी तेथून जाणारा एक दुचाकीस्वार या घटनेच्या विळख्यात अडकला होता. सुदैवाने तो थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले.

या अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या एक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. अखेर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन पडलेले झाड व पोल बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. "अवजड वाहने नियम धाब्यावर बसवून चालवली जातात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पसार होणाऱ्या अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी आक्रमक ग्रामस्थांनी केली आहे.