
कुडाळ : जिल्ह्याच्या राजकारणात आणि सत्ताधारी पक्षात राहून 'मिठाचा खडा' टाकणाऱ्या आणि अंतर्गत वाद लावून आपल्या पोळ्या भाजणाऱ्या स्वकीयांचा पालकमंत्र्यांनी आज कुडाळ येथील व्यासपीठावरून चांगलाच समाचार घेतला. "पक्षातील तीन-चार 'शकुनी मामा' आणि त्यांची टीम गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आमच्यात दरी निर्माण करण्याचे काम करत आहे, ही मस्ती त्यांनी आता थांबवावी, अन्यथा येत्या काळात त्यांचे हिशोब चुकता केले जातील," असा थेट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी पक्षातील काही ठराविक लोकांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "काहीजण संध्याकाळी एकत्र बसून फक्त चर्चेचे गुऱ्हाळ चालवतात. जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याऐवजी, जे काही चांगले सुरू आहे त्यात अडथळे कसे आणायचे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीपासून जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत हे 'काड्या' लावणारे लोक एकच आहेत."
राणे कुटुंब आणि रवींद्र चव्हाण यांच्यात दरी पाडण्याचा प्रयत्न
"मंत्री रवींद्र चव्हाण हे अत्यंत साधे आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले व्यक्तिमत्व आहे. मात्र, चव्हाण आणि आमचे कुटुंब, तसेच निलेश राणे यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत. व्यासपीठावर बसलेल्यांनाही मी कोणाबद्दल बोलतोय हे नीट ठाऊक आहे. त्यामुळे अशा लोकांनी आता ही हालचाल थांबवावी," अशा शब्दांत त्यांनी तंबी दिली.
आमदार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक करताना पालकमंत्री म्हणाले की, "निलेश राणे विधिमंडळात ज्या पद्धतीने मुद्देसूद आणि आकडेवारीनिशी मांडणी करतात, ती वाखाणण्याजोगी आहे. समोरचा मंत्री आपला सहकारी असला तरी जनहितासाठी त्यांना धारेवर धरताना मी निलेश राणेंना जवळून पाहिले आहे. भाऊ म्हणून मी त्यांना जेवढं ओळखतो, तेवढं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही." याचवेळी त्यांनी माजी लोकप्रतिनिधीवर निशाणा साधताना, "ते चुकून दोन वेळा निवडून आले होते," असा टोलाही लगावला.
येत्या चार वर्षात कोणत्याही निवडणुका नसल्याने आता पूर्ण लक्ष विकासावर आणि संघटनात्मक बांधणीवर असेल, असे स्पष्ट करत पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. "खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास होणारच, पण त्यासोबतच पक्षाला पोखरणाऱ्या 'शकुनी मामांचा' हिशोबही चुकता केला जाईल," असे सूचक विधान त्यांनी केले. राणे साहेबांना पाहिल्यावर कार्यकर्त्यांच्या अंगात दहा हत्तींचे बळ संचारते, त्यामुळे नवीन लोक जोडण्यापेक्षा आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद देणे हेच आमचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.











