LIVE UPDATES

स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाला नवं वळण

जुने वीजमीटर काढून नेण्यात आल्याचा आरोप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 18:18 PM
views 20  views

  • ओरोस पंचक्रोशीतील वीज ग्राहकांची पोलीस ठाण्याला धडक 

सिंधुदुर्गनगरी :  स्मार्ट मीटर बसविताना जुने वीजमीटर काढून नेण्यात आल्याचा आरोप करत ओरोस पंचक्रोशीतील १०० हून अधिक वीजग्राहकांनी सोमवारी महावितरण कंपनी तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाला यामुळे नवे वळण मिळाले असून वीजग्राहकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ओरोस पंचक्रोशीतील विविध गावांतील वीजग्राहक सकाळी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे एकत्र आले. यानंतर त्यांनी सामूहिकरित्या अर्ज भरून महावितरण अधिकाऱ्यांकडे तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार सादर केली. स्मार्ट मीटर बसविताना पूर्वीचे मीटर कोणतीही लेखी नोंद अथवा संमती न घेता काढून नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वीजग्राहकांनी सादर केलेल्या निवेदनात जुने मीटर नेमके कोणाच्या ताब्यात आहेत, त्याची नोंद कुठे आहे आणि ते कोणत्या प्रक्रियेनुसार हटविण्यात आले याची माहिती देण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत वीजग्राहकांमध्ये असंतोष असून विविध शंका आणि आक्षेप व्यक्त केले जात आहेत. यामुळे पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  यावेळी ओरोस पंचक्रोशी वीजग्राहक संघटना अध्यक्ष नागेश ओरोसकर, सरपंच पांडुरंग मालवणकर, रविंद्र परब, रेश्मी वेंगुर्लेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.