LIVE UPDATES

मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या नव्या कार्यकारिणीची निवड

समाजसेवेच्या वाटचालीला अधिक गती देण्याचा निर्धार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 18:38 PM
views 17  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी, क्रीडाप्रेमी, सांस्कृतिक जपणूक आणि आरोग्यविषयक जनजागृती यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या संस्थेने आता नव्या उमेदीने आणि नव्या जबाबदाऱ्यांसह समाजसेवेच्या वाटचालीला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संस्थेचे संस्थापक पैलवान ललित हरमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानच्या नव्या कार्यकारिणीत जावेद शेख यांची अध्यक्षपदी, तर प्रा. रूपेश पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी पैलवान गौरव कुडाळकर, सचिवपदी फिजा मकानदार, सहसचिवपदी कामाक्षी महालकर आणि खजिनदारपदी पैलवान नागेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच साबाजी परब यांच्याकडे मुख्य प्रसारण प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली असून, नेहा ढोले यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड झाली आहे. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रेरणा पोकळे, महिला संघटक म्हणून मिताली राऊळ आणि पुरुष संघटक म्हणून दशरथ गोंड्याळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून भाविका कदम, कार्यक्रम समन्वयक म्हणून पैलवान बुधाजी हरमलकर, सांस्कृतिक समन्वयक म्हणून किशोर हरमलकर तसेच महिला सांस्कृतिक समन्वयक म्हणून श्रुती सावंत यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय नासिर मकानदार यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या नव्या कार्यकारिणीकडून समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून सामाजिक परिवर्तन, युवा सक्षमीकरण आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. "सेवेचा ध्यास, समाजाचा विकास" हे ब्रीद जपत मल्लसम्राट प्रतिष्ठानची ही नवी टीम समाजहिताच्या कार्यात नवे आदर्श निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.  नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छाही प्रदान करण्यात आल्या.