
सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुले राहील. तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन अशी ग्वाही विशाल परब यांनी दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, केतन आजगांवकर, धीरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसन्ना देसाई म्हणाले, विशाल परब यांच्या सुविद्य पत्नी यांनी देखील यावर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असलेला जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. तसेच दैनिक कोकणसादच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.










